लॅपरोस्कोपिक सर्जरी / दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

लॅपरोस्कोपी म्हणजे काय?

लॅपरोस्कोपी, ज्याला डायग्नॉस्टिक लॅपरोस्कोपी म्हणूनही ओळखले जाते, ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी जोखमीची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया आहे. यासाठी फक्त काही लहान छेद घेण्याची आवश्यकता असते.

लॅपरोस्कोपीमध्ये पोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी लॅपरोस्कोप नावाचे साधन वापरले जाते. लॅपरोस्कोप हा एक लांब आणि पातळ नलिकेसारखा असतो. त्याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश आणि उच्च-रिझोल्यूशन असलेला कॅमेरा असतो. पोटावर लहान छेद घेऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घातली जातात. या साधनांच्या आणि पोटातील अवयवांच्या प्रतिमा कॅमेराद्वारे व्हिडिओ मॉनिटरवर दिसतात.

लॅपरोस्कोपीमुळे डॉक्टरांना आपल्या शरीरातील अवयवांची खुली शस्त्रक्रिया न करताही प्रत्यक्ष तपासणी करता येते. या प्रक्रियेदरम्यान आपल्या डॉक्टरांना बायोप्सी (पुढील तपासणीसाठी) नमुने देखील घेता येतात.

लॅपरोस्कोपी का केली जाते?

लॅपरोस्कोपी बहुतेक वेळा पोटातील किंवा ओटीपोटातील वेदनांचा स्रोत ओळखण्यासाठी आणि निदान करण्यासाठी वापरली जाते. नॉन-इन्व्हेसिव्ह पद्धती जेव्हा निदान करण्यास अक्षम असतात तेव्हा सहसा लॅपरोस्कोपी केली जाते.
बऱ्याच बाबतीत, पोटाच्या समस्येचे निदान इमेजिंग (प्रतिमा) तंत्रज्ञानाने केले जाऊ शकते. उदाहरणार्थ:

 • अल्ट्रासाऊंड, यात शरीराच्या अवयवांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी उच्च- वारंवारितेच्या ध्वनी लहरी वापरल्या जातात.
 • सीटी स्कॅन, ही विशेष क्ष -किरणांची मालिका आहे ज्यात शरीराच्या अवयवांच्या उभ्या किंवा आडव्या प्रतिमा ठराविक अंतराने घेतल्या जातात.
 • एमआरआय स्कॅन, यात शरीराच्या अवयवांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी चुंबक आणि रेडिओ वेव्ह वापरल्या जातात.

जेव्हा वरील तपासण्यांद्वारे रोगाची पुरेशी माहिती मिळत नाही किंवा रोग निदान होत नाही तेव्हा लॅपरोस्कोपी केली जाते. यात शरीरातील एखाद्या विशिष्ट अवयवातून बायोप्सी किंवा ऊतींचे नमुने देखील घेता येतात.
खालील अवयवांची तपासणी करण्यासाठी आपले डॉक्टर लॅपरोस्कोपीची शिफारस करू शकतात:

 • अँपेंडिक्स
 • पित्ताशय
 • यकृत
 • पॅनक्रिया / स्वादुपिंड
 • लहान आतडे आणि मोठे आतडे
 • स्प्लीन / प्लीहा
 • जठर
 • ओटीपोटातील किंवा प्रजनन अवयव

लॅपरोस्कोपीच्या मदतीने पोटातील अवयवांची तपासणी करून आपले डॉक्टर खालील आजारांचे निदान करू शकतात:

 • पोटातील गाठ किंवा कर्करोग
 • पोटातील द्रव
 • यकृताचे रोग
 • काही उपचारांची प्रभावितता
 • ज्या विशिष्ट कर्करोगाची प्रगती झाली आहे ती स्थिती

तसेच, या निदानानंतर डॉक्टर  रुग्णाला अधिक प्रभावी उपचार देण्यास सक्षम होऊ शकतात.