पचनसंस्थेच्या तक्रारी: एक आढावा
आपण सर्वांनीच कधी ना कधी पित्त होणे, अपचन, छातीत जळजळ होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, जुलाब, पोट दुखणे, पोटात कळ येणे, बद्धकोष्ठता, इत्यादि लक्षणांचा अनुभव घेतला आहे. कॅलोम्समध्ये आम्ही सर्वोत्तम निदान, वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया सेवा प्रदान करतो.

गॅस्ट्रिक रिफ्लक्स सर्जरी:
आपल्याला जर छातीत जळजळ होणे, आंबट पाणी वर येणे किंवा पित्त होणे इ. त्रास आठवड्यातून दोन किंवा जास्त वेळा होत असेल तर आपल्याला जीईआरडी (गॅस्ट्रो-ओसोफेजेल रिफ्लक्स – जठरातील पदार्थ अन्ननलिकेत उलट मार्गे फिरणे) हा त्रास असू शकतो. औषधोपचारांनी या त्रासाची लक्षणे कमी होतात परंतु नैसर्गिक शरीररचना दुरुस्त होत नाही. तसेच त्रासाची प्रगतीही थांबत नाहीत. औषधोपचारांमुळे त्रासाचे मूळ कारण झाकले जाते. दिवसेंदिवस अधिकाधिक औषधे लागतात पण लक्षणांमध्ये फार फरक पडत नाही.
आपल्याला आता हा त्रास सहन करण्याची गरज नाही. कॅलोम्स,पुणे हे जीईआरडी (गॅस्ट्रो-ओसोफेजल रिफ्लक्स डिसीज) च्या उपचारासाठी भारतातील सर्वोत्तम केंद्रांपैकी एक आहे. इथे जीईआरडीसाठी सर्वात आधुनिक उपचार केले जातात.
कॅलोम्समध्ये सर्वोत्कृष्ट शास्त्रीय उपचार, निसन्स फंडोप्लायकेशन ही शस्त्रक्रिया केली जाते. डॉ. गिरीश बापट सर्वात आधुनिक वैद्यकीय उपचार देतात. दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे.
जीईआरडी म्हणजे काय?
आपण खाल्लेले अन्न तोंडातून अन्ननलिकेद्वारे जठरामध्ये जाते. अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी एक झडप असते. ही झडप उघडली की अन्न जठरामध्ये जाते व झडप पूर्ण बंद होते. ही झडप बंद झाल्यामुळे अन्न व जठरातील आम्ल पुन्हा उलट मार्गाने अन्ननलिकेत प्रवेश करू शकत नाही. अशा रीतीने एकेरी वाहतूक सुरळीत सुरु असते.
ज्यांना जीईआरडी चा त्रास असतो त्या लोकांमध्ये ही झडप पूर्ण बंद होत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न व जठरातील आम्ल उलट मार्गाने पुन्हा अन्ननलिकेत प्रवेश करते.
अन्ननलिकेच्या आतील अस्तर अतिशय नाजूक असते. जठरातील आम्ल या अस्तराच्या संपर्कात आले की छातीत किंवा घशात जळजळ होते. यामुळे घशात आंबट पाणी आल्यासारखेही वाटू शकते.
छातीत कधीतरी जळजळ झाल्यास प्रत्येक वेळी जीईआरडी असतोच असे नाही. परंतु हा त्रास आठवड्यातून दोन किंवा जास्त वेळा होत असेल तर जीईआरडी असण्याची शक्यता खूप जास्त असते. जीईआरडीमुळे भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
जीईआरडीची लक्षणे काय असतात?
जीईआरडीचा त्रास असणाऱ्या बहुतेक रुग्णांना छातीत जळजळ होते व आंबट पाणी वर येते. परंतु याशिवाय इतर अनेक लक्षणे आढळतात –
- छातीत जळजळ होणे
- वारंवार ढेकर येणे
- अन्न / आंबट पाणी वर येणे
- छातीत दुखणे (हृदयविकार नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे)
- आवाज बदलणे
- वारंवार घसा दुखणे
- गिळताना त्रास होणे किंवा अन्न घशात अडकले आहे असे वाटणे
- कोरडा खोकला
- श्वासाची दुर्गंधी
जीईआरडीची कारणे काय असतात?
जीईआरडी अनेक कारणांमुळे होतो असे मानले जाते. परंतु सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी असणाऱ्या झडपेतील दोष हे आहे. अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी स्नायूंची गोलाकार झडप असते. या झडपेमुळे अन्न एका मार्गाने येऊ शकते. जीईआरडी मध्ये ही झडप पूर्ण बंद होत नाही व त्यामुळे खाल्लेले अन्न व जठरातील आम्ल उलट मार्गाने पुन्हा अन्ननलिकेत जाते.
हायाटल हर्निया – जठराचा वरचा भाग काही वेळा डायफ्रॅम (छातीची पोकळी आणि उदरपोकळी यांना वेगळे करणारे स्नायूपटल) मधून वर खेचला जातो.
जीईआरडीची इतर काही कारणे अशी –
- मद्यपान
- धूम्रपान
- अतिरिक्त वजन
- गर्भावस्था
- खूप वेगाने जेवणे
- अतिप्रमाणात जेवणे
- रात्री उशीरा जेवणे
- खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा
- तेलकट, तूपकट,अति मसालेदार खाणे
- पोषक आहाराचा अभाव
- सोडायुक्त पेये – उदा. कोक, लिम्का, पेप्सी इ.
जीईआरडीमुळे होणारी गुंतागुंत:
जीईआरडीमुळे रोजच्या जीवनमानावर तर परिणाम होतोच शिवाय इतर अनेक गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते –
- अन्ननलिकेला सूज
- अन्ननलिका अरुंद होणे
- बॅरेट एसोफॅगस: अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.
निदान:
आपले डॉक्टर वारंवार होणारी छातीतील जळजळ आणि इतर लक्षणे यावरून जीईआरडीचे निदान करू शकतात. आपल्याला खालीलपैकी काही त्रास होत असतील तर जीईआरडीसाठी पुढील तपासण्या करणे आवश्यक ठरते –
- गिळताना वेदना होणे
- गिळताना त्रास होणे
- औषधे घेऊन देखील लक्षणांमध्ये फरक पडत नाही.
पुढील तपासण्यांचा उद्देश जीईआरडीच्या निदानाला पुष्टी मिळणे हा आहे. त्याचबरोबर आपली लक्षणे इतर काही कारणांमुळे (उदा: अपचन, लहान / मोठया आतड्याचा दाह इ.) आहेत का याचा शोध घेणे हेही आहे.
एन्डोस्कोपी (गॅस्ट्रोस्कोपी):
एन्डोस्कोपी अन्ननलिका व जठर यांची आतील रचना दर्शविते. तसेच जीईआरडीची सद्यस्थिती आणि संभाव्य गुंतागुंतीची (अन्ननलिकेच्या सूज, अरूंदपणा, बॅरेट एसोफॅगस / कर्करोगाची शक्यता इ.) तीव्रता दर्शविते. रुग्णाची लक्षणे, एन्डोस्कोपी करताना घेतलेल्या नमुन्यांचे परीक्षण यावरून जीईआरडीचे निदान केले जाऊ शकते. एन्डोस्कोपीमध्ये इतर काही आजार उदा: जठरातील जखमा, पोटाचा कर्करोग इ नसल्याची खात्री केली जाते. या आजारांची लक्षणे काही प्रमाणात जीईआरडीसारखीच असतात.
मॅनोमेट्री
अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी स्नायूंची गोलाकार झडप असते. या स्नायूंमधील शक्ती मोजून ही झडप कसे कार्य करते आहे हे तपासण्यासाठी मॅनोमेट्री हे तंत्र वापरले जाते. जीईआरडीचे निदान करण्यासाठी मॅनोमेट्री आवश्यक नाही, परंतु ही तपासणी समान लक्षणे असलेले इतर आजार नाहीत याची खात्री करण्यास मदत करते. तसेच शस्त्रक्रिया केल्यानंतर ही झडप व्यवस्थित काम करेल याची खात्री करण्यासही मॅनोमेट्रीचा उपयौग होतो.
बेरियम क्ष – किरण तपासणी
या तपासणीला barium swallow or upper GI series असेही संबोधले जाते. पचनसंस्थेच्या वरच्या भागातील रोगाचे निदान करण्यासाठी ही तपासणी वापरली जाते. या प्रक्रियेमध्ये रुग्णाला पांढऱ्या रंगाचा द्रव पदार्थ पिण्यासाठी दिला जातो. हा द्रव पदार्थ पचनसंस्थेच्या आतल्या बाजूने आवरण तयार करतो. त्यानंतर ठराविक वेळेच्या अंतराने क्ष – किरण प्रतिमा घेतल्या जातात. या आवरणामुळे अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याचा पहिला भाग यांच्या प्रतिमा घेता येतात व त्यातील आजाराचे निदान करता येते. तसेच या तंत्राद्वारे हायाटल हर्नियाचे देखील निदान करता येते.
२४ तास – पीएच तपासणी
या तपासणीद्वारे अन्ननलिकेतील आम्लाचे प्रमाण तपासात येते. या तपासणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणाद्वारे २४ तासात जठरामधील आम्ल कधी आणि किती वेळ उलट मार्गे अन्ननलिकेत आले आहे हे तपासले जाते.
उपचार:
जीईआरडीची उपचार योजना आखताना पुढील गोष्टी क्रमाक्रमाने करणे आवश्यक आहे – लक्षणे नियंत्रित करणे, अन्ननलिकेची सूज बरी करणे आणि वारंवार येणारी अन्ननलिकेच्या सूज आणि इतर गुंतागुंत यांना प्रतिबंध करणे
जीईआरडीच्या उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश केला जातो –
- जीवनशैलीतील बदल
- औषधोपचार – जठरामधील आम्ल कमी करण्यासाठी औषधे (अँटासिड किंवा पीपीआय)
- शस्त्रक्रिया
जीवनशैलीत सुधारणा
जीईआरडी असल्यास आपल्या जीवनशैलीत खालील सुधारणा उपयुक्त ठरु शकतात –
- वजन जास्त असल्यास वजन कमी करावे. यामुळे पोटाच्या आतील भागातील दाब कमी होतो व त्यामुळे लक्षणे कमी होण्यास मदत होते.
- धूम्रपान टाळावे – धूम्रपानामुळे पचन संस्थेच्या आतील भागाचे नुकसान होते व त्यामुळे आपली लक्षणे तीव्र स्वरूपात जाणवू शकतात.
- दिवसातील तीन मोठ्या जेवणांपेक्षा थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे खावे. तसेच रात्रीचे जेवण झोपण्याच्या वेळेपूर्वी तीन ते चार तास करावे.
- मद्यपान, कॉफी, चॉकलेट, टोमॅटो, तेलकट किंवा मसालेदार खाण्यामुळे जीईआरडीची लक्षणे तीव्र स्वरूपात जाणवू शकतात. यापैकी कोणत्याही पदार्थांच्या सेवनाने आपली लक्षणे वाढत असतील ते पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत.
- आपल्या पलंगाची डोक्याकडील बाजू लाकडाचा तुकडा किंवा वीट ठेवून सुमारे २० सें.मी. (८ इंच) ने उंच करावी. यामुळे आपली लक्षणे कमी होण्यास मदत होते. अतिरिक्त उतार वापरू नये कारण त्यामुळे पोटाच्या आतील दाब वाढू शकतो.
औषधोपचार
जीईआरडीच्या उपचारांसाठी अनेक औषधे वापरली जाऊ शकतात –
- ओव्हर द काउंटर औषधोपचार (अँटासिड)
- असिड इनहिबिटर (पीपीआय)
औषधांचा कालावधी रुग्णाच्या लक्षणांच्या प्रतिसादानुसार कमी किंवा जास्त करावा लागतो.
ओव्हर द काउंटर औषधोपचार (अँटासिड)
जीईआरडीच्या सौम्य ते मध्यम लक्षणांसाठी अँटासिडचा उपयोग होतो. ही औषधे जठरातील आम्लाचा परिणाम नाहीसा करतात. ही औषधे जेवणानंतर घ्यावीत. यामुळे अन्ननलिका व जठराच्या आतल्या भागावर पातळ संरक्षक आवरण तयार होते व या भागांना जठरातील आम्लामुळे इजा होत नाही. परंतु ही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण या औषधांच्या परिणामामुळे इतर काही औषधे शरीरात शोषली जात नाहीत. तसेच काही औषधांवरील संरक्षक आवरण नष्ट होते.
प्रोटॉन-पंप इनहिबिटर (पीपीआय)
जीवनशैलीत सुधारणा करून जर जीईआरडीच्या लक्षणांमध्ये फरक पडत नसेल तर प्रोटॉन-पंप इनहिबिटर (पीपीआय) या वर्गातील औषधे वापरली जातात. या औषधांमुळे जठरात आम्ल तयार होण्याचे प्रमाण कमी केले जाते.
बहुतेक रुग्णांमध्ये या औषधांचा चांगला उपयोग होतो. या औषधांचे सहसा काही दुष्परिणाम दिसत नाहीत. काही वेळा सौम्य प्रमाणात खालील दुष्परिणाम आढळतात.
- डोकेदुखी
- जुलाब
- मळमळ
- पोटदुखी
- बद्धकोष्ठता
दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी करण्यासाठी रुग्णाला आवश्यक तेवढीच औषधे दिली जातात. काही वेळा रुग्णाला दीर्घकाळ उपचार घ्यावे लागू शकतात.
एच २-रिसेप्टर अँटॅगॉनिस्ट (एच २ आर ए)
जर पीपीआय या वर्गातील औषधांमुळे रुग्णाची जीईआरडीची लक्षणे कमी होत नसतील तर पीपीआय सोबत किंवा त्याऐवजी एच २ आर ए या वर्गातील औषधांचा उपयोग केला जातो. एच २ आर ए या औषधांमुळे हिस्टामिन (जठरात आम्ल तयार होण्यासाठी हिस्टामिन ची आवश्यकता असते) या रासायनिक द्रव्याचा प्रभाव नष्ट केला जातो. यामुळे जठरातील आम्ल तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
शस्त्रक्रिया:
अँटी-रिफ्लक्स शस्त्रक्रिया (निसन्स फंडोप्लायकेशन) ही जीईआरडीसाठी अत्यंत प्रभावी उपचारपद्धती आहे. औषधांमुळे जर जीईआरडीच्या लक्षणांवर फरक पडत नसेल किंवा लक्षणे पुनःपुन्हा उद्भवत असतील तर शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरते. ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केली जाते. यासाठी संपूर्ण भूल देण्याची आवश्यकता असते. शस्त्रक्रियेसाठी सुमारे १ ते २ तासांचा कालावधी लागतो. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला २ ते ३ दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
निसन्स फंडोप्लायकेशन + हायाटल हर्नियाची शस्त्रक्रिया
या शस्त्रक्रियेमध्ये प्रथम छातीच्या पोकळीत ओढला गेलेला जठराचा भाग खाली घेऊन पुन्हा उदरपोकळीत आणला जातो. त्यानंतर डायफ्रामच्या (छातीची पोकळी व उदरपोकळी यांना वेगळे करणारे स्नायूंचे आवरण) कमकुवत भागावर आवश्यक तेवढे टाके घातले जातात. जठराचा वरील भाग (फंडस) अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी असलेल्या कमकुवत झडपेभोवती गोलाकार घेऊन एक कृत्रिम झडप तयार केली जाते. यामुळे जठरातील आम्ल उलट मार्गे पुन्हा अन्ननलिकेत जाऊ शकत नाही.
शस्त्रक्रियेच्या पहिले काही आठवडे आहाराची पथ्ये पाळणे आवश्यकआहे. सुरुवातील द्रव पदार्थ आणि नंतर हळूहळू शिजवून मऊ केलेले पदार्थ खावेत. कठीण पदार्थ खाल्ल्यास ते अडकून बसण्याची शक्यता असते. या शस्त्रक्रियेनंतर काही लोकांना गिळताना त्रास होणे हा दुष्परिणाम जाणवू शकतो.
शस्त्रक्रिया किती सुरक्षित आहे?
जीईआरडीसाठी केली जाणारी शस्त्रक्रिया ही नेहमी केल्या जाणाऱ्या इतर अनेक (उदा: पित्ताशय काढणे, हर्नियाची शस्त्रक्रिया) शस्त्रक्रियांइतकीच सुरक्षित आहे. तथापि, कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेप्रमाणे या शस्त्रक्रियेतही जंतुसंसर्ग, रक्तस्त्राव आणि इतर अवयवांना (अन्ननलिका, जठर इ.) इजा असे धोके संभवू शकतात.
काही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर मर्यादित काळासाठी खालील दुष्परिणाम जाणवू शकतात.
- ढेकर येणे
- पोट फुगल्यासारखे वाटणे
- पोटामध्ये वात धरणे
हे दुष्परिणाम काही महिन्यांत कमी होतात.