भगंदर

भगंदर

गुदद्वाराजवळील भगंदर म्हणजे गुदद्वार आणि त्याजवळील त्वचा यामध्ये तयार झालेला अनैसर्गिक मार्ग. याची सुरुवात सहसा गुदद्वाराजवळ गळू तयार होऊन होते. भगंदराचा त्रास स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो.

भगंदर होण्याची कारणे:

गुदद्वाराजवळील भागात फोड / गळू झाल्याचा परिणाम म्हणून सहसा भगंदर होते. सुमारे २० – २५ % लोकांमध्ये गुदद्वाराजवळ गळू झाल्यानंतर भगंदर होण्याचा त्रास होतो. क्वचित काहीवेळा गुदाशय / गुदद्वाराच्या कर्करोगाची सुरुवात भगंदराने होते.

खालील आजार असल्यास भगंदर होण्याचा धोका वाढतो –

• मोठ्या आतड्याची दीर्घकालीन सूज – Crohn’s Disease आणि Ulcerative Colitis
• क्षयरोग, मधुमेह आणि एचआयव्ही यासारखे आजार
• गुदद्वाराला किंवा त्याजवळील भागाला पूर्वी झालेली इजा
• गुदद्वार किंवा त्याजवळील भागाला पूर्वी दिलेले क्ष – किरण उपचार (रेडिएशन थेरपी)

भगंदराची लक्षणे:

गुदद्वाराजवळ दीघकालीन गळू असल्यास त्याचे पर्यवसान सहसा भगंदर होण्यात होते. यामुळे गुदद्वाराजवळील त्वचेवर पू, रक्त किंवा चिकट स्त्राव होतो. हा स्त्राव सतत होत राहतो किंवा अधूनमधून थांबतो. काही वेळा तीव्र वेदना, सूज, शौचाच्या सवयीत बदल तसेच ताप, थकवा, अशक्तपणा इ. लक्षणेदेखील जाणवू शकतात. तपासणी केल्यानंतर त्वचेजवळ सहसा एक छिद्र दिसते. गुदाशयाच्या तपासणीनंतर भगंदराचा त्वचेखालील मार्ग हाताला जाणवू शकतो.

तपासणी:

सिग्मोइडोस्कोपी – गुदद्वाराच्या आतील बाजूचे छिद्र पाहण्यासाठी सिग्मोइडोस्कोपी ही तपासणी केली जाते.

इतर तपासण्या –

  • एमआरआय इमेजिंग,
  • फिस्टुलोग्राफी
  • सोनोग्राफी – भगंदराचा उर्वरित मार्ग तपासण्यासाठी गुदद्वाराजवळील भागाच्या सोनोग्राफीचा उपयोग होऊ शकतो.

 पार्कच्या वर्गीकरणानुसार, भगंदराचे पुढील चार प्रकार आहेत:

  • इंटर-स्फिंक्टेरिक भगंदर (नेहमी आढळणारा प्रकार)
  • ट्रान्स-स्फिंक्टेरिक भगंदर
  • सुप्रा-स्फिंक्टेरिक भगंदर (क्वचित आढळणारा प्रकार)
  • अतिरिक्त-स्फिंक्टेरिक भगंदर

भगंदरासाठी उपचारः

रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्यास काही औषधोपचार किंवा कमीतकमी उपाय अवलंबले जातात. परंतु ज्या रुग्णांसाठी हा मार्ग योग्य ठरत नाही त्यांच्यासाठी शस्त्रक्रियेचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

शस्त्रक्रिया:

भगंदरासाठी कोणती शस्त्रक्रिया योग्य आहे हे भगंदराच्या प्रकारानुसार आणि भगंदर कुठे आहे त्यानुसार ठरवले जाते –

  • फिस्टुलोटोमी – या शस्त्रक्रियेमध्ये एक बोथट उपकरण भगंदराचे त्वचेवरील छिद्र, त्वचेखालील भाग, गुदद्वाराच्या आतील छिद्र यात घालून हा संपूर्ण मार्ग उघडला जातो. हा मार्ग उघडा ठेवून त्यावर ड्रेसिंग केले जाते. हळूहळू ही जखम भरून येते.
  • सेटन बांधणे – या प्रक्रियेमध्ये नायलॉन किंवा रेशमाचा धागा भगंदराच्या संपूर्ण मार्गातून घालून बाहेरील बाजूस त्याची गाठ बांधली जाते. आवश्यकतेनुसार ही गाठ घट्ट केली जाते. हळूहळू या धाग्यामुळे स्नायू कापले जाऊन भगंदराचा मार्ग उघडला जातो. साधारणपणे ६ ते ८ आठवड्यात हा धागा पूर्णपणे निघून येतो. फिस्टुलोटोमीशिवाय सेटन वापरणे देखील शक्य आहे.
  • इतर उपचार: Mucosal Advancement Flap, LIFT Procedure, Diversion.
Bariatric Treatment in Pune

शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत:

शस्त्रक्रियेनंतर पुढील काळात खालील गुंतागुंत होण्याची शक्यता असते-

  • भगंदर पुन्हा उद्भवणे – फिस्टुलोटोमीनंतर ० – १८ % लोकांमध्ये तसेच सेटनचा वापर केल्यानंतर ० – १७ % रुग्णांमध्ये पुन्हा भगंदर होण्याची शक्यता असते.
  • शौचावर ताबा न राहणे
  • गुदद्वाराचा मार्ग अरुंद होणे – जखम बरी होण्याच्या प्रक्रियेत काही वेळा त्या भागातील पेशी कडक होतात त्यामुळे गुदद्वाराचा मार्ग अरुंद होण्याची शक्यता असते. शौच जास्त प्रमाणात तयार होण्यासाठी दिलेली औषधे हे टाळण्यासाठी मदत करु शकतात.
  • जखम भरून येण्यास विलंब – सामान्यत: १२ आठवड्यात जखम पूर्ण भरून येते. परंतु भगंदर पुन्हा उद्भवल्यास किंवा इतर काही आजार (उदा: Crohn’s Disease) असल्यास जखम भरून येण्यास वेळ लागतो.