पित्ताशय

पित्ताशयातील खड्यांचे निदान व उपचारांसाठी डॉक्टर / सर्जन, पुणे

पित्ताशय: एक आढावा

पित्ताशय हा यकृताच्या मागे व खालच्या बाजूला असलेला एक छोटा पिशवीसारखा अवयव आहे. पित्ताशयाचे मुख्य काम पित्त साठवणे व त्याचे संपृक्तीकरण करणे हे आहे. यामुळे आहारातील चरबीचे पचन होण्यास मदत होते.

पित्ताशयात खडे होण्याची कारणे काय असतात?

पित्तामध्ये कोलेस्टेरॉल तसेच इतर अनेक रासायनिक द्रव्ये असतात. या सर्वांमध्ये असमतोल निर्माण झाल्यास पित्ताशयात खडे तयार होतात असे मानले जाते. बहुतेक वेळा पित्तामधील कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते आणि या अतिरिक्त कोलेस्टेरॉलचे खडे तयार होतात. पित्ताशयातील खडे हा बऱ्याच लोकांमध्ये आढळून येणारा त्रास आहे.

पित्ताशयात खडे होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढतो –

 • प्रमाणापेक्षा जास्त वजन
 • स्त्री – स्त्रियांमध्ये पित्ताशयात खडे होण्याचा त्रास पुरुषांपेक्षा २ – ३ पटींनी जास्त आढळतो.
 • ४० वर्षांपेक्षा जास्त वय
 • स्त्रियांमध्ये मुले झाल्यानंतर – गर्भावस्थेमध्ये स्त्रियांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये अनेक बदल घडून येतात. या बदलांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते व म्हणूनच पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो.

पित्ताशयातील खड्यांची लक्षणे काय असतात?

पित्ताशयातील खड्यांमुळे होणार त्रास हा व्यक्तिगणिक वेगळा असू शकतो. परंतु काही लक्षणे पित्ताशयाच्या सर्व त्रासांमध्ये आढळतात. या त्रासाची सुरुवात सहसा पोटाच्या वरील भागात मध्यभागी किंवा उजवीकडे दुखण्याने होते.

नेहमी आढळणारी लक्षणे अशी –

 • पोटात तीव्र वेदना
 • या वेदना पोटातून उजव्या खांद्याकडे किंवा पाठीकडे जातात.
 • जेवल्यानंतर / काही खाल्ल्यानंतर विशेषतः चरबीयुक्त (तेल-तूप असणारे) पदार्थ खाल्ल्यानंतर या वेदना वाढतात.
 • पोटात टोचल्यासारखे / कळ येऊन दुखते किंवा मध्यम तीव्रतेचे पण सतत दुखते.
 • दीर्घ श्वास घेतल्यावर वेदना वाढतात.
 • छातीत दुखते.
 • छातीत जळजळ, अपचन पोटात वाट धरणे.
 • पोट सतत फुगल्यासारखे वाटणे,पोटात गुबारा धरणे.
 • मळमळ, उलट्या, ताप येणे.
 • थंडीने हुडहुडी भरणे.
 • पोटात विशेषतः वरच्या भागात उजव्या बाजूला हात लावल्यावर दुखणे.
 • कावीळ – त्वचा, डोळे पिवळसर दिसणे.
 • शौचाचा रंग बदलणे – फिका / मातकट दिसणे.

काही वेळा विशेषतः जर खडे पित्ताच्या प्रवाहाला अडथळा करत नसतील किंवा अडकलेले नसतील तर त्या व्यक्तीला कुठलीही लक्षणे दिसत / जाणवत नाहीत. अशावेळी पित्ताशयातील खडे इतर काही कारणांसाठी केलेल्या क्ष – किरण / पोटाची सोनोग्राफी / CT – scan तपासणीत किंवा पोटाच्या इतर शस्त्रक्रियेत देखील आढळून येतात. आपल्याला जर पित्ताशयातील खड्यांची कुठलीही लक्षणे आढळून आली तर त्वरित निदान व उपचारांसाठी आपल्या सर्जनशी संपर्क साधावा. 

gastric Reflux Treatment
hernia doctor
Gallbladder stones treatment in Pune
 • पित्ताशयाला सूज: पित्ताशयातील खडे जर पित्ताशयाच्या अरुंद तोंडाशी अडकले तर तिथे जंतुसंसर्ग होऊन पित्ताशयाला सूज येते. यामुळे अतिशय तीव्र वेदना होतात व ताप येतो.
 • पित्ताशयात पू होणे: तीव्र जंतुसंसर्ग झाल्यास पित्ताशयात पू तयार होतो व गळू होऊ शकते. अशा वेळी अँटी-बायोटिक्सचा उपयोग होतोच असे नाही. असे झाल्यास तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते.
 • पित्ताशय फुटणे: खूप सुजलेले पित्ताशय कधी कधी फुटू शकते व आतील सर्व पू / जंतुसंसर्ग सर्व पोटात पसरतो. अशा वेळी तोंडावाटे घ्यायच्या अँटी-बायोटिक्सचा उपयोग होत नाही तर ते शिरेवाटे द्यावे लागते. तसेच तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते.
 • पित्तनलिकेला अडथळा: पित्त्ताशयामधून व यकृतामधून ज्या नलिकांद्वारे पित्त आतड्यात जाते त्या नलिकांमध्ये हे खडे अडकू शकतात. असे झाल्यास कावीळ किंवा पित्तनलिकेला सूज येऊ शकते.
 • स्वादुपिंडाच्या नलिकेला अडथळा: पॅनक्रिया / स्वादुपिंडामधून येणारी नलिका पित्तनलिकेला छोट्या आतड्याजवळ मिळते. स्वादुपिंडातून स्रवणारी पाचक द्रव्ये या नलिकांद्वारे छोट्या आतड्यात सोडली जातात. याठिकाणी जर पित्ताशयातील खडा अडकला तर पॅनक्रिया / स्वादुपिंडाला देखील सूज येऊ शकते. स्वादुपिंडाचे सूज ही गंभीर स्थिती असून रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागते. अतिदक्षता विभागात देखील ठेवावे लागू शकते.
 • पित्ताशयाचा कर्करोग: पित्ताशयातील खड्यांचा त्रास असलेल्या व्यक्तींना पित्ताशयाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.

पित्ताशयात खडे असून देखील बऱ्याच लोकांना त्याचा काही त्रास / लक्षणे जाणवत नाहीत. हे खडे अनेकदा इतर काही कारणांसाठी केलेल्या तपासणीत आढळून येतात. आपल्याला जर काही लक्षणे दिसत / जाणवत असतील तर त्वरित आपल्या सर्जनशी संपर्क साधावा. त्यामुळे आपल्या त्रासाचे योग्य निदान होईल. 

 पोटाची सोनोग्राफी: सहसा पित्ताशयात खडे असल्याचे निदान पोटाची सोनोग्राफी करून करता येते. या तंत्रामध्ये उच्च वारंवारितेच्या ध्वनी लहरी त्वचेमार्फत शरीरात सोडल्या जातात. त्या शरीरातील अवयवांवर आदळल्यामुळे ज्या प्रतिमा तयार होतात त्या मॉनिटर वर दिसतात. ही तपासणी केवळ १० – १५ मिनिटात पूर्ण होते तसेच यात रुग्णाला कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत.

पित्तनलिकेमध्ये असलेले खडे कधीकधी या तंत्राद्वारे दिसू शकतात. पण ते दिसले नाहीत तर त्यासाठी MRI स्कॅन ही तपासणी लागते.

एमआरआय (MRI) स्कॅन: पित्तनलिकेमधील खडे पाहण्यासाठी एमआरआय स्कॅन केले जाते. या तपासणीमध्ये शरीराच्या आतील अवयवांच्या तपशीलवार प्रतिमा तयार केल्या जातात.

कोलँजिओग्राफी: या तपासणीमुळे आणखी सखोल माहिती मिळू शकते. या प्रक्रियेत एक विशिष्ट डाय / रंग आपल्या रक्तप्रवाहात सोडला जातो. पित्ताशय काढण्याच्या शस्त्रक्रियेच्यावेळी पित्तनलिका बघण्यासाठी असे करता येते किंवा एंडोस्कोपद्वारे (पुढे कॅमेरा असलेली एक पातळ ट्यूब) हा डाय / रंग शरीरात सोडून पित्तनलिका / स्वादुपिंड नलिकेमध्ये काही अडथळा आहे का हे पाहता येते. पित्तनलिका / स्वादुपिंड नलिकेमध्ये खडे अडकले असल्यास ते त्याच वेळी एंडोस्कोपद्वारे काढता येतात. या प्रक्रियेला एंडोस्कोपिक रिट्रोग्रेड कोलँजिओ-पॅनक्रिएटोग्राफी (ERCP) म्हटले जाते.

सीटी स्कॅन: पित्तशतखड्यांमुळे झालेल्या गुंतागुंतीचे (उदा: स्वादुपिंडाला सूज) निदान करण्यासाठी सहसा सीटी स्कॅन ही तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये वेगवेगळ्या कोनातून अनेक क्ष – किरण प्रतिमा घेतल्या जातात.

आपली उपचार योजना आपल्याला होणाऱ्या त्रासाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. रुग्णाला तपासल्यानंतर सर्जन आपल्याला योग्य तो पर्याय सुचवतात.

 

औषधोपचार / शस्त्रक्रिया न करता केलेले उपचारः शस्त्रक्रिया (पित्ताशय काढणे – cholecystectomy) ही पित्ताशयातील खड्यांच्या उपचारांची मुख्य पद्धत आहे. परंतु रुग्ण जर शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त नसेल किंवा शस्त्रक्रिया करण्यास नकार देत असेल तर आपले डॉक्टर काही औषधोपचार सुचवू शकतात. हे उपचार रुग्णाला त्यावेळी होत असणारा त्रास / जंतुसंसर्ग किंवा त्यावेळी त्रास देत असलेले खडे नष्ट करण्यास मदत करतात. परंतु हे उपचार नवीन खडे तयार होण्यास प्रतिबंध करू शकत नाहीत तसेच वारंवार होणार त्रास थांबवू शकत नाहीत.   

लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी (दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे): आपल्या पोटावर तीन ते चार लहान छेद घेतले जातात. एक छेद (२ – ३ से.मी. दरम्यान) नाभीजवळ घेतला जातो आणि इतर छेद (प्रत्येकी 1 सेमी किंवा कमी) पोटाच्या उजव्या बाजूला असतात.कार्बन डाय ऑक्साईड वायूचा वापर करून तुमचे पोट फुगवले जाते. एका छेदामधून लॅपरोस्कोप (एक लांब, पातळ टेलिस्कोप – याच्या तोंडाशी प्रकाश आणि व्हिडियो कॅमेरा असतो) पोटात घातला जातो. यामुळे आपल्या सर्जनला शस्त्रक्रिया व्हिडिओ मॉनिटरवर दिसते. शस्त्रक्रियेची साधने वापरून आपले पित्ताशय काढून टाकले जाते. पित्ताशय काढल्यानंतर आत सोडलेला वायू लॅपरोस्कोपमधून बाहेर पडतो. पोटावरचे छेद विरघळण्याऱ्या टाक्यांनी बंद केले जातात आणि ड्रेसिंगने झाकले जातात. शस्त्रक्रियेसाठी सुमारे ६० ते ९० मिनिटे लागतात.

ओपन (पारंपारिक) / पोटावर छेद घेऊन केलेली शस्त्रक्रिया: काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे किंवा रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी Laparoscopic cholecystectomy / दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे योग्य ठरत नाही. अशावेळी पोटावर छेद घेऊन शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये पोटाच्या वरच्या भागात मध्यभागी किंवा उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली सुमारे १४ – १५ से. मी. (४ – ६ इंच) लांब छेद घेतला जातो व पित्ताशय काढले जाते. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना जर काही गुंतागुंत (उदा: अतिरिक्त रक्तस्त्राव) झाली तर मोठा छेद घेऊन शस्त्रक्रिया करावी लागते. असे होण्याची शक्यता ५ % असते.  

ही शस्त्रक्रिया देखील दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेइतकीच प्रभावी आहे, परंतु यानंतर रुग्णाला पूर्ववत होण्यास थोडा जास्त वेळ लागतो. सहसा पोटावर छेद घेउन केलेल्या शस्त्रक्रियेनंतर पूर्ववत होण्यास ४ – ६ आठवडे लागतात.

शस्त्रक्रियेदरम्यान दिल्या जाणाऱ्या भुलीची औषधे बंद केल्यानंतर रुग्णाला काही काळ शस्त्रक्रिया विभागातील देखभाल कक्षात (रिकव्हरी रूम) मध्ये ठेवले जाते. त्यानंतर रुग्णाला आपल्या खोलीत नेले जाते. पूर्ववत होण्याचा कालावधी आपल्या शस्त्रक्रियेच्या प्रकारानुसार बदलतो. 

दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया / लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी: सहसा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्यानंतर लोक २ दिवसात घरी जाऊ शकतात. काहीवेळा रुग्णाला रुग्णालयात आणखी एक रात्र  राहण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे रुग्ण खायला, प्यायला लागला असेल आणि आधार न घेता चालू शकत असेल तर डॉक्टर रुग्णाला घरी जाण्याची परवानगी देऊ शकतात. पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो.

पोटावर छेद घेऊन केलेली शस्त्रक्रिया / ओपन कोलेसिस्टेक्टॉमी: या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात ४ – ५ दिवस राहावे लागू शकते. घरी परत आल्यावर पूर्णपणे बरे होण्यासाठी सरासरी चार ते सहा आठवडे लागू शकतात.

बहुतेक लोक दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर एक किंवा दोन आठवड्यात पूर्ण बरे होतात आणि कामाला सुरुवात तसेच हलका व्यायामही करू शकतात. जास्त श्रमाचे व्यायाम / काम करण्यासाठी १ महिना थांबावे. पोटावर छेद घेऊन केलेल्या शस्त्रक्रियेनंतर पूर्ण बरे होण्यासाठी थोडा अधिक कालावधी लागतो.  

गाडी चालवणे –

गाडी चालवण्याआधी आपल्या सर्जनचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ब्रेक दाबताना जोपर्यंत दुखणे /अस्वस्थता असेल तोपर्यंत गाडी चालवणे टाळावे (गाडी बंद असताना सराव करून पाहावे). सहसा दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर १ – २ आठवड्यात गाडी चालवता येते. Open / पोटावर छेद घेऊन केलेल्या शस्त्रक्रियेनंतर मात्र हा कालावधी थोडा वाढू शकतो. 

काही विमा कंपन्या शस्त्रक्रियेनंतर ठराविक आठवड्यांसाठी गाडी चालवल्यास रकमेची भरपाई करत नाहीत म्हणून गाडी चालविणे सुरु करण्याआधी आपण आपल्या विमा कंपनीला सांगणे उचित आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

सर्जरीमधील धोके:

पित्ताशय काढणे ही शस्त्रक्रिया सामान्यत: सुरक्षित आहे आणि या शस्त्रक्रिये मध्ये कमी धोका आहे, परंतु इतर कोणत्याही शस्त्रक्रियेप्रमाणे काही धोक्यांची शक्यता असते –

 • रक्तस्त्राव
 • जंतुसंसर्ग
 • पित्ताची गळती
 • रक्ताच्या गुठळ्या
 • हृदयविकार
 • दीर्घकालीन वेदना (ओपन / पोटावर छेद घेऊन केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये याची शक्यता जास्त असते)
 • पोटातील इतर अवयवांना इजा (पित्ताशयाची नळी, यकृत छोटे आतडे इ.)

शस्त्रक्रियेच्या वेळी गुंतागुंत होण्याची शक्यता किती आहे हे रुग्णाच्या संपूर्ण आरोग्यावर आणि शस्त्रक्रिया करावी लागण्याचे कारण यावर अवलंबून आहे. शस्त्रक्रियेआधी रुग्ण वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त आहे याची खात्री करण्यासाठी प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी केली जाते.  

पित्ताशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च:

पित्ताशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो

 • खोलीचा प्रकार (Private room, semi -private room, general ward)
 • Open (पोटावर छेद घेऊन) / लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
 • हॉस्पिटलची निवड इ.
 • रुग्णाला आधी असणारे आजार उदा. मधुमेह, हृदयविकार यासारख्या वैद्यकीय परिस्थितीत गंभीर देखरेख आवश्यक असेल तर हॉस्पिटल मध्ये राहण्याचा कालावधी व पर्यायाने खर्च वाढू शकतो.

डॉक्टरांबरोबर आपली प्रथम भेट झाल्यानंतर आम्ही आपल्याला खर्चाचा साधारण अंदाज देऊ शकतो.

Bajaj Finserve च्या सहकार्याने आम्ही आपणासाठी सुलभ आर्थिक पर्याय उपलब्ध केलाआहे. आपण खर्चाची संपूर्ण रक्कम ८ सुलभ मासिक हप्त्यांमध्ये भरू शकता. 

पुनर्तपासणी:

शस्त्रक्रियेनंतर आपल्या सर्जनना १० ते १२ दिवसांनी भेटावे.

Related Videos

Laparoscopic Cholecystectomy