ऍबडॉमिनोप्लास्टी किंवा टमी टक

ऍबडॉमिनोप्लास्टी किंवा टमी टक:

व्यायाम आणि वजन नियंत्रणाद्वारे आपण सर्वजण सपाट आणि सक्षम स्नायू असलेल्या पोटाचे स्वप्न पाहतो. काहीवेळा या पद्धती अपेक्षित परिणाम प्राप्त करू शकत नाहीत.

अनेक लोकांमध्ये शरीराचे वजन, आकार आणि बीएमआय(बॉडी मास इंडेक्स) सामान्य असतो परंतु फक्त पोट पुढे आलेले असते किंवा शिथिल स्नायूंमुळे पुढे लटकलेले दिसते. विशेषतः मध्यमवयीन लोकांमध्ये ही स्थिती दिसते. याची नेहमी आढळणारी करणे अशी –  

  • वाढते वय 

  • अनुवंशिकता

  • गर्भावस्था 

  • पूर्वी झालेल्या पोटावरील शस्त्रक्रिया

वजनामध्ये लक्षणीय चढउतार

ऍबडॉमिनोप्लास्टी किंवा टमी टक म्हणजे काय?

टमी टक शस्त्रक्रिया किंवा ऍबडॉमिनोप्लास्टी या शस्त्रक्रियेमध्ये अतिरिक्त चरबी आणि त्वचा काढून टाकली जाते. शिथिल असलेले किंवा एकमेकांपासून वेगळे झालेले स्नायू पुन्हा पूर्वस्थितीत आणले जातात. यामुळे पोट सपाट आणि भक्कम होते. 

यामुळे पोटातील वेदना कमी करण्यास मदत होते, मूत्राशयाचे कार्य सुधारण्यास मदत होते तसेच अतिरिक्त त्वचेमुळे होणारा जंतुसंसर्ग, खाज इ.कमी होण्यास मदत होते. 

टमी टकसाठी योग्य उमेदवार कोण आहेत?

टमी टक हे चांगले आरोग्य असलेल्या पुरुष आणि स्त्रियांसाठी योग्य आहे आणि आदर्शतः धूम्रपान न करणारे असावेत.

ज्या महिलांची अनेक बाळंतपणे झाली आहेत त्यांना पोटाचे स्नायू भक्कम करण्यासाठी तसेच पोटाची अतिरिक्त त्वचा कमी करण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग होतो. 

ज्या व्यक्ती पूर्वी अतिस्थूल होत्या आणि वजन कमी झाल्यानंतरही ज्यांना अजूनही पोटाभोवती अतिरिक्त चरबी किंवा त्वचा आहे त्यांना देखील टमी टक या प्रक्रियेचा खूप फायदा होतो.

ऍबडॉमिनोप्लास्टी शस्त्रक्रिया:

या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला संपूर्ण भूल दिली जाते. शस्त्रक्रियेची व्याप्ती किती आहे यावर ही शस्त्रक्रिया किती वेळ चालेल हे अवलंबून असते. 

या शस्त्रक्रियेचे दोन प्रकार आहेत –

  • पूर्ण ऍबडॉमिनोप्लास्टी – यात अतिरिक्त त्वचा काढून टाकली जाते आणि पोटाच्या समोरच्या भागातील स्नायू भक्कम केले जातात. यासाठी पोटाच्या खालच्या भागावर कमरेच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत पूर्ण मोठा आडवा व वक्र छेद घेतला जातो. अतिरिक्त त्वचा आणि चरबी वर उचलली जाते. शिथिल किंवा एकमेकांपासून वेगळे झालेले स्नायू पूर्वस्थितीत आणून भक्कम केले जातात. अतिरिक्त त्वचा व चरबी काढून पोट पुन्हा शिवले जाते.     

  • आंशिक ऍबडॉमिनोप्लास्टी – अनेक लोकांना फक्त नाभीच्या खाली जास्त चरबी असते. या शस्त्रक्रियेमध्ये नाभीच्या खाली असलेली अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते आणि फक्त पोटाच्या खालच्या भागातील स्नायू भक्कम केले जातात.

ऍबडॉमिनोप्लास्टी या शस्त्रक्रियेला असणाऱ्या मर्यादा:

ऍबडॉमिनोप्लास्टी ही शस्त्रक्रिया वजन कमी करणे किंवा योग्य व्यायाम करणे यासाठीचा पर्याय म्हणून केली जात नाही. या शस्त्रक्रियेचे परिणाम तांत्रिकदृष्ट्या कायमस्वरूपी असले तरी वजनामध्ये लक्षणीय चढउतार होत असल्यास अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. पोटावर असलेले Stretch Marks (त्वचा अति ताणल्यामुळे दिसणाऱ्या खुणा) या शस्त्रक्रियेने जात नाहीत. परंतु जी त्वचा काढायची आहे त्यावरच हे Stretch Marks असतील तर ते कमी झालेले दिसतात.   

शस्त्रक्रियेनंतरची संभाव्य गुंतागुंत:

शस्त्रक्रियेनंतर काही दिवस रुग्णाला वेदना आणि सूज असू शकते. त्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातात व कशी काळजी घ्यावी हे रुग्णाला सांगितले जाते. शस्त्रक्रिया केलेला भाग काही आठवडे ते काही महिने किंचित दुखरा राहू शकतो. 

शस्त्रक्रियेनंतर काही दिवस रुग्णाला जखमेच्या जागी बधीरपणा, ओढल्यासारखे वाटणे किंवा आणि थकवा इ. जाणवू शकतो. क्वचित काही वेळा त्वचेखाली जंतुसंसर्ग, रक्तस्त्राव किंवा पायात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. रुग्णाला रक्ताभिसरणाच्या तक्रारी, मधुमेह, किंवा हृदय, फुफ्फुस किंवा यकृताचे रोग असल्यास गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. 

जखम बरी होण्यास विलंब झाल्यास अथवा पूर्ण बरी न झाल्यास रुग्णाला लक्षणीय व्रण राहतो किंवा काही त्वचा गमवावी लागते. तरीही पूर्ण बरे न झाल्यास दुसऱ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता लागू शकते.

टंमी टक नंतर पोटावर व्रण राहतो. काही काळानंतर हा व्रण पूर्ण गेला नाही तरी बऱ्याच अंशी फिकट होऊ शकतो. रुग्णाची जखम पूर्ण बरी झाल्यानंतर आपले डॉक्टर व्रणावर लावण्यासाठी काही मलम वापरण्याची शिफारस करू शकतात.

भारतात ऍबडॉमिनोप्लास्टी किंवा टमी टक या शस्त्रक्रियेची किंमतः

भारतातील ऍबडॉमिनोप्लास्टी किंवा टमी टक या शस्त्रक्रियेची किंमत खालील घटकांवर अवलंबून असते – 

  • रुग्णाने निवडलेले हॉस्पिटल

  • शस्त्रक्रियेचा प्रकार

  • भूल देण्याचा प्रकार 

  • शस्त्रक्रियेची व्याप्ती 

  • रुग्णाच्या तक्रारींचे निदान

  • रुग्णाच्या आरोग्याची स्थिती व त्यासोबत असणारे त्रास उदा: मधुमेह, रक्तदाब इ. 

  • हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी

  • रुग्णाने निवडलेला खोलीचा प्रकार 

  • इतर उपचार

तथापि, सरासरी किंमत रु. १, २५, ००० ते २, ००, ००० यादरम्यान असते.