मोठ्या आतड्याचा दाह

मोठ्या आतड्याचा दाह / जळजळ / IBS

हा पचनसंस्थेशी संबंधित असणारा त्रास बऱ्याच लोकांमध्ये आढळतो. बऱ्याच लोकांना दीर्घकाळपर्यंत याचा त्रास होतो. यामुळे पोटात गुबारा धरल्यामुळे पोट फुगणे, पोट कळ येऊन दुखणे, जुलाब आणि / अथवा बद्धकोष्ठ अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे तसेच या लक्षणांची तीव्रता व्यक्तिगणिक बदलते. काही लोकांमध्ये ही लक्षणे अतिशय तीव्र स्वरूपात दिसतात. ही लक्षणे अधून मधून जाणवतात. तसेच ती काही दिवस ते काही महिने टिकतात. सहसा ही लक्षणे मानसिक ताणतणाव असेल तर किंवा काही विशिष्ट अन्नपदार्थ खाल्ल्यावर जास्त जाणवतात. काही लक्षणांमध्ये शौच झाल्यानंतर बरे वाटते. पाचपैकी एका व्यक्तीला (२० % लोकांना) आयुष्यात कधी ना कधी हा त्रास होतो असे दिसून आले आहे. बरेचदा वयाच्या २० – ३० वर्षांदरम्यान हा त्रास प्रथम जाणवू लागतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या त्रासाचे प्रमाण जवळजवळ दुपटीने जास्त आहे असे दिसून येते. काही लोकांमध्ये ही लक्षणे अतिशय तीव्र स्वरूपात दिसतात. काही लोक आहार व जीवनशैलीत बदल करून आणि मानसिक तणावाचे योग्य नियोजन करून या लक्षणांवर नियंत्रण ठेवू शकतात. परंतु काही लोकांना औषधोपचार आणि समुपदेशनाची आवश्यकता भासते.

मोठ्या आतड्याचा दाह / जळजळ / IBS होण्याची कारणे

 • आतड्याच्या स्नायूंचे अनियमित आकुंचन
 • पचनसंस्थेला आधी झालेला जंतुसंसर्ग
 • मानसिक ताण, चिंता, नैराश्य
 • पचनसंस्थेच्या स्नायूंचे आकुंचन व प्रसरण अनियमित होणे
 • अतिरिक्त खाणे
 • आहारातील चरबीचे अतिरिक्त प्रमाण
 • अतिजलद खाणे
 • खाण्याच्या अनियमित वेळा
 • धूम्रपान

लक्षणे:

ही लक्षणे सहसा काही खाल्यानंतर दिसतात. तसेच ती अधूनमधून जाणवतात. बऱ्याच लोकांमध्ये ही लक्षणे काही दिवस टिकतात. यानंतर, ती सामान्यतः सुधारतात परंतु पूर्ण नाहीशी होत नाहीत.

नेहमी आढळणारी मुख्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

 • पोट दुखणे किंवा पोटात कळ येणे – बरेचदा शौचानंतर हे दुखणे कमी होते.
 • शौचाच्या सवयींमध्ये बदल – उदा. जुलाब, बद्धकोष्ठ किंवा दोन्ही
 • पोटात गुबारा धरणे / पोट फुगणे
 • पोटात वात होणे.
 • शौचास घाई होणे.
 • पोट पूर्ण साफ झाले नाही असे वाटणे
 • शौचाच्या वेळी चिकट स्त्राव येणे

या त्रासामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनमानावर तसेच मानसिक स्वास्थ्यावर लक्षणीय फरक पडू शकतो. परिणामी बऱ्याच लोकांना चिंता व नैराश्य याना सामोरे जावे लागते.

कारणीभूत ठरणारे घटक:

आतड्यातील जळजळ किंवा दाह होण्याचे नेमके कारण सांगणे अवघड असले तरी बहुतेक तज्ञांच्या मते हा त्रास पचनक्रियेच्या समस्या आणि आतडे अतिसंवेदनशील होणे याच्याशी संबंधित आहे. आतड्याची सूज, जंतुसंसर्ग किंवा आहारातील काही घटक या त्रासासाठी कारणीभूत आहेत असे मानले जाते परंतु यातील एकही गोष्ट सिद्ध झालेली नाही.

पचनक्रियेच्या समस्या

आपल्या पचनसंस्थेमध्ये अन्ननलिकेपासून शेवटपर्यंत स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणामुळे अन्न पुढेपुढे सरकते. ही क्रिया एका विशिष्ट लयीत सुरु असते. परंतु असे मानले जाते कि IBS मध्ये या क्रियेत बदल होतो व अन्न पचनसंस्थेमधून अन्न अतिशय वेगाने किंवा अतिशय हळूहळू पुढे सरकते. अन्न अतिशय वेगाने पुढे सरकल्यास जुलाब होण्याचा त्रास होतो कारण पचनसंस्थेला अन्नामधून पाणी शोषून घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. याउलट जर अन्न अतिशय हळूहळू पुढे सरकले तर खूप पाणी शोषले जाते, शौच कठीण होते व बद्धकोष्ठ होतो. मेंदूकडून पचनसंस्थेकडे जाणाऱ्या संकेतांमध्ये काही व्यत्यय आल्यानेही असे होत असावे असे मानतात. पचनसंस्थेकडून मेंदूकडे भूक लागणे, शौचाची भावना होणे यासारखे अनेक संकेत जात असतात. तज्ज्ञांच्या मते IBS असणारे रुग्ण या संकेतांसाठी  अतिसंवेदनशील असतात. म्हणजेच बहुतेक लोकांना जाणवणारे सौम्य अपचन IBS असणाऱ्या व्यक्तींमध्ये तीव्र पोटदुखी घेऊन समोर येते.

मानसिक कारणे

IBS ची लक्षणे जाणवण्यामध्ये काही मानसिक कारणेही महत्त्वाची भूमिका बजावतात. तणाव आणि चिंता यासारख्या तीव्र भावनिक अवस्थांमुळे शरीरात काही रासायनिक बदल होतात. यामुळे पचनसंस्थेच्या नेहमीच्या कार्यामध्ये अडथळा येऊ शकतो. IBS असणाऱ्या लोकांनाच नेहमी असे होते असे नाही तर बऱ्याच लोकांना आतड्याचा काही विकार नसताना देखील तणावपूर्ण परिस्थितीमध्ये (उदा:  परीक्षा, नोकरीसाठी मुलाखत इ) अचानक शौचाच्या सवयीत बदल झालेला आढळतो. IBS असणाऱ्या काही व्यक्तींच्या पूर्वायुष्यात किंवा लहानपणी काही क्लेशकारक घटना घडलेली आढळून येते. उदा: रुग्णाच्या वाट्याला पूर्वी आलेले गैरवर्तन / दुर्लक्ष, गंभीर आजार, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू इ. अश्या प्रकारच्या पूर्वानुभवांमुळे काही लोक मानसिक ताणतणाव, वेदना आणि अस्वस्थता यासाठी अतिसंवेदनशील होऊ शकतात.

IBS च्या लक्षणांना कारणीभूत ठरणारे घटक:

काही खाद्यपदार्थ आणि पेये आतड्यातील जळजळीच्या लक्षणांना सक्रिय करु शकतात. ही लक्षणे व्यक्तिगणिक बदलतात परंतु नेहमी आढळणारी लक्षणे अशी –

 • मद्यपान
 • शीत पेये
 • चॉकलेट, आइसक्रीम
 • चहा, कॉफी किंवा शीत पेये
 • प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ – चिप्स, बिस्किटे इ.
 • तळलेले पदार्थ

आपण खाल्लेल्या पदार्थांची नोंद ठेवल्याने लक्षणांना कारणीभूत ठरणारे घटक शोधण्यास मदत होते. मानसिक ताणतणाव हा आतड्यातील जळजळीच्या लक्षणांना कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून तणावपूर्ण स्थिती हाताळण्यासाठी योग्य मार्ग शोधणे हा उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.

निदान:

IBS चे निदान बऱ्याच अंशी रुग्णाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणीवर अवलंबून असते. IBS चे निदान करण्यासाठी रुग्णाला पोटदुखी किंवा पोटात अस्वस्थ वाटणे ही लक्षणे असणे आवश्यक आहे. तसेच हे दुखणे किंवा अस्वस्थता शौचास कमी होते किंवा या लक्षणांसोबत रुग्णाला सारखी शौचाची भावना होते किंवा शौचाच्या घट्टपणात बदल झालेला दिसून येतो.

यासोबतच खालीलपैकी किमान दोन लक्षणे असणे आवश्यक आहे –

 • शौचाच्या सवयींमध्ये बदल – जोर करावा लागणे, शौचास घाई होणे, शौचास जाऊन आल्यानंतरदेखील पोट पुरेसे साफ झाले नाही असे वाटणे
 • पोट फुगल्यासारखे वाटणे, कडक वाटणे, किंवा पोटामध्ये ताण आहे असे वाटणे
 • खाण्यानंतर पोटामध्ये अधिक त्रास होणे
 • शौचाच्या वेळी चिकट स्त्राव येणे

रुग्णाला काही जंतुसंसर्ग, अन्न आतड्यात पुरेसे शोषले न जाणे इ. त्रास नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टर आणखी काही तपासण्यांची शिफारस करू शकतात. तसेच रुग्णाला कर्करोग नाही याची खात्री करण्यासाठीदेखील काही तपासण्या कराव्या लागू शकतात.  

Flexible सिग्मोइडोस्कोपी: या तपासणीमध्ये सिग्मोइडोस्कोप (ही एक पातळ, लवचिक नलिका असते. याच्या पुढील बाजूस प्रकाश व कॅमेरा असतो) वापरून आतड्याच्या खालच्या भागाची (Sigmoid Colon) तपासणी केली जाते.

कोलोनोस्कोपी: काही रुग्णांमध्ये विशेषतः वय ५० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि काही गंभीर आजार असण्याची शक्यता वाटत असेल तर कोलोनोस्कोपी ही तपासणी केली जाते. यात गुदद्वारातून कोलोनोस्कोप (ही एक पातळ, लवचिक नलिका असते. याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश व कॅमेरा असतो) आत घालून संपूर्ण मोठ्या आतड्याची तपासणी केली जाते.

कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन: या तपासणीमध्ये शरीरातील अवयवांच्या ठरविक अंतराने आडव्या प्रतिमा घेतल्या जातात. या तपासणीद्वारे रुग्णाच्या पोटदुखीच्या कारणाचे निदान करण्यास डॉक्टरांना मदत होते.

Lactose intolerance tests: दूध व इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये असलेल्या साखरेचे पचन करण्यासाठी आपल्या शरीरातील लेक्टेझ नावाचे एक एंझाइम मदत करते. शरीरात जर हे एंझाइम पुरेसे तयार होत नसेल तर पोट दुखणे, पोटात गुबारा धरणे, जुलाब होणे इ.  IBS सारखीच लक्षणे दिसू शकतात.

रक्ताची तपासणी: Celiac disease या आजारात रुग्णाचे शरीर गहू, बार्ली आणि राई या धान्यांमध्ये असलेल्या प्रथिनांसाठी अतिसंवेदनशील असते. यामुळेदेखील IBS सारखीच लक्षणे दिसतात. रक्ताच्या तपासणीमुळे हा आजार नाही याची खात्री करण्यास मदत होते. IBS नसलेल्या मुलांपेक्षा IBS असलेल्या मुलांमध्ये Celiac disease चा धोका जास्त असतो. आपल्या डॉक्टरांना Celiac disease ची शक्यता वाटत असल्यास ते रुग्णाला पचनसंस्थेच्या वरच्या भागाची एन्डोस्कोपी करण्याचा सल्ला देऊ शकतात. या तपासणीद्वारे लहान आतड्यामधून तपासणीसाठी नमुने घेता येतात.

 शौचाची तपासणी: जर आपल्याला जुलाबाचा दीर्घकालीन त्रास असेल तर डॉक्टर आपल्याला बॅक्टेरिया किंवा परजीवींचा जंतुसंसर्ग नाही याची खात्री करण्यासाठी शौचाची तपासणी करण्याचा सल्ला देऊ शकतात.

उपचारः

IBS ची लक्षणे सहसा आपल्या आहार आणि जीवनशैलीत बदल करून आटोक्यात ठेवता येतात. काही वेळा औषधे किंवा मानसोपचार देखील उपयुक्त ठरू शकतात.

IBS ची लक्षणे आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात केलेले बदल महत्त्वाची भूमिका बजावतात. आपले शरीर कोणत्या खाण्याला कसा प्रतिसाद देते यावर आहारात काय बदल करायचे ते ठरवले जाते. आपल्याला कोणत्या खाण्याने त्रास होतो व काय खाल्ल्याने बरे वाटते याची नोंद करुन ठेवणे हिताचे ठरते. यामुळे त्रासदायक पदार्थ टाळणे सोपे जाते. हे पदार्थ आयुष्यभरासाठी टाळावे लागतातच असे नाही हेही लक्षात ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.  

तंतुमय पदार्थ

IBS असणा-या रुग्णांना आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण सुधारण्यासाठी सल्ला दिला जातो. तंतुमय पदार्थांचे दोन मुख्य प्रकार आहेत – विरघळणारे तंतुमय पदार्थ (यांचे शरीरात पचन होते) आणि न विरघळणारे तंतुमय पदार्थ (यांचे शरीरात पचन होत नाही).

विरघळणारे तंतुमय पदार्थ असलेले खाद्यपदार्थ –

 • ओट्स
 • जव
 • राई
 • फळे – उदा: केळी आणि सफरचंद
 • कंदमुळे – उदा: गाजर आणि बटाटे

न विरघळणारे तंतुमय पदार्थ असणारे खाद्यपदार्थ

 • whole grain ब्रेड
 • धान्याची टरफले
 • धान्ये
 • तेलबिया (उदा: शेंगदाणे, सुकामेवा इ.)

जुलाब होत असल्यास आहारातील न पचणाऱ्या तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी करावे. उदा: फळे व भाज्या यांच्या साली. याउलट जर बद्धकोष्ठ होत असेल तर आहारातील पचणाऱ्या तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवावे. CALOMS मधील आहारतज्ज्ञ आपल्याला आहारातील तंतुमय पदार्थांमध्ये कसे बदल करावेत याबाबत मार्गदर्शन करू शकतात.

Low FODMAP diet: आपल्याला सतत किंवा वारंवार पोटात गुबारा धरण्याचा त्रास होत असेल तर Low FODMAP diet हा एक विशेष आहार उपयोगी ठरू शकतो. FODMAP म्हणजे Fermentable Oligosaccharides, Disaccharides, Monosaccharides and Polyols. या प्रकारच्या कर्बोदकांचे सहजासहजी विघटन होत नाही तसेच ती आतड्यात शोषली जात नाहीत. याचाच अर्थ या कर्बोदकांचे किण्वन प्रक्रिया (कुजण्याची प्रक्रिया) तुलनेने लवकर सुरू होते. या प्रक्रियेत सोडल्या जाणाऱ्या वायूंमुळे पोटात गुबारा धरला जातो. Low FODMAP diet मध्ये या प्रकारची कर्बोदके मर्यादित प्रमाणात खाण्यास सांगितले जाते. उदा: काही फळे, भाज्या, दूध, गहू, आणि शेंगवर्गातील भाज्या. आपल्याला Low FODMAP diet सुरु करायचे असल्यास आहारतज्ञांच्या सल्ल्याने करावे. यामुळे आपला आहार आरोग्यदायी व संतुलित राहील. 

आहाराबद्दलच्या इतर सूचना

खालील सूचनांचे पालन केल्यास IBS च्या लक्षणांमध्ये सुधारणा होण्यास मदत होते –

 • खाण्याच्या वेळांचे नियमित पालन करावे आणि सावकाश जेवावे.
 • जेवण टाळू नये तसेच दोन खाण्यांमध्ये जास्त वेळाचे अंतर ठेवू नये.
 • दिवसातून कमीतकमी २.५ ते ३ लिटर पाणी प्यावे.
 • आपल्या चहा किंवा कॉफीचे सेवन मर्यादित ठेवावे. (दिवसात जास्तीतजास्त २ कप)
 • मद्यपान तसेच शीतपेयांचे सेवन टाळावे.
 • पचण्यास जड अशा कर्बोदकांचे सेवन टाळावे. ही कर्बोदके न पचता लहान आतड्यातून जशीच्या तशी मोठ्या आतड्यात पोचतात. ही कर्बोदके प्रक्रिया केलेल्या तसेच पुनःपुन्हा शिजवलेल्या अन्नात आढळून येतात.
 • फळे – फळांचे सेवन मर्यादित ठेवावे. (दिवसात जास्तीतजास्त ३ मध्यम आकाराची फळे खावीत)
 • जुलाब होत असल्यास Sorbitol (sugar free गोळया) चे सेवन टाळावे. च्युईंग गम, काही पेये, मधुमेहाची काही औषधे तसेच बारीक होण्यासाठी असलेल्या उत्पादनांमध्ये Sorbitol असू शकते.

पोटात गुबारा धरत असल्यास ओट्स किंवा जवस (दिवसातून जास्तीतजास्त १ टीस्पून) खाल्ल्याने फायदा होऊ शकतो

व्यायाम

बऱ्याच रुग्णांना नियमित व्यायाम केल्याने IBS च्या लक्षणांमध्ये सुधारणा झालेली दिसते.

आठवड्यात कमीतकमी १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेचे दमश्वासाचे (उदा: जलद चालणे किंवा सायकल चालविणे) व्यायाम करण्याचे ध्येय ठेवावे. 

मानसिक ताणतणावाचे नियोजन:

मानसिक ताणतणाव कमी झाल्यास IBS च्या लक्षणांची तीव्रता तसेच वारंवार होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून येते. खालील उपाय ताणतणाव कमी करण्यास मदत करू शकतात.

 • मनःशांती – मनःशांतीसाठी ध्यान, चिंतन, तसेच श्वासावर लक्ष केंद्रित करावे.
 • शारीरिक हालचाल – योगासने,Pilate किंवा Tai Chi
 • नियमित व्यायाम – चालणे, सायकल चालवणे, पोहणे इ.

काही विशिष्ट स्वरूपाचा तणाव असल्यास समुपदेशन किंवा CBT (Cognitive Behavioural Therapy) या उपचार पद्धतीचा उपयोग होऊ शकतो.

Probiotics

ही पूरक औषधे असतात. या औषधांमुळे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते असा निर्मात्यांचा दावा असतो. यामध्ये आतड्याला उपयुक्त असे जीवजंतू असतात. IBS मध्ये काही वेळा आतड्यातील जीवजंतूंचा नैसर्गिक समतोल ढासळतो. Probiotics मुळे हा समतोल पुनःप्रस्थापित करण्यास मदत होते. नियमितपणे ही औषधे घेणाऱ्या काही लोकांना IBS च्या लक्षणांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसते. आपल्याला ही औषधे घेऊन पाहायची असल्यास किमान ४ आठवडे नियमित घेऊन पाहावीत.

 

IBS च्या उपचारांसाठी सहसा खालील औषधे वापरली जातात –

 • Anti – Spasmodics – या औषधांमुळे स्नायूंमधील पेटके / कळ येणे कमी होते त्यामुळे पोटातील वेदना होण्यास मदत होते.
 • Laxatives – या औषधांमुळे बद्धकोष्ठ कमी होते व पोट साफ होण्यास मदत होते.
 • Anti – Motility औषधे – या औषधांमुळे जुलाबाच्या त्रास कमी होण्यास मदत होते.
 • Low-dose Antidepressants – ही औषधे मूलतः नैराश्य कमी करण्यासाठी वापरतात. परंतु याशिवाय ही औषधे पोटातील वेदना तसेच कळ कमी करण्यासदेखील मदत करू शकतात.

या औषधांची खाली तपशीलवार चर्चा केली आहे.

Antispasmodic (उदा: Mebeverine आणि औषधी पेपरमिंट ऑइल) औषधांमुळे आपल्या पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम मिळण्यास मदत करतात. या औषधांचे दुष्परिणाम अत्यल्प आहेत. तथापि, पेपरमिंट ऑइल घेणाऱ्या काही लोकांना छातीत जळजळ तसेच गुदद्वाराजवळील त्वचेला खाज येण्याचा त्रास होऊ शकतो.

Laxative या प्रकारातील औषधे बद्धकोष्ठ असल्यास दिली जातात. या औषधांमुळे शौच मऊ व भरपूर प्रमाणात तयार होते. तशेच शौच करणे सुलभ होते. या औषधांसोबत भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शौच करताना अडथळा होत नाही.

Antimotility medicines (उदा: Loperamide) या प्रकारातील औषधे जुलाबासाठी दिली जातात. यामुळे आतड्यातील स्नायूंचे आकुंचन कमी होते व पचनसंस्थेतून अन्न पुढे सरकण्याचा वेग कमी होतो. यामुळे अन्नातून पाणी शोषून घेण्यास व शौच घट्ट होण्यास पुरेसा वेळ मिळतो. 

मानसोपचार

मानसोपचार पद्धतींचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व उपचार पद्धतींमध्ये आपली मनःस्थिती योग्य प्रकारे कशी हाताळावी याची तंत्रे शिकवली जातात. IBS असलेल्या अनेक रुग्णांना याउपचार पद्धतींचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. 

खालील प्रकारच्या मानसोपचार पद्धती उपलब्ध आहेत –

 • मानसोपचार – या पद्धतीमध्ये प्रशिक्षित व्यक्ती रुग्णाशी संवाद साधते तसेच रुग्णाला स्वतःच्या समस्या व चिंता यांचा खोलवर विचार करून त्या योग्य प्रकारे हाताळण्यास मदत करते.
 • Cognitive Behavioural Therapy (CBT) – या मानसोपचार पद्धतीमध्ये रुग्णाला आपले विचार व पूर्वग्रह यांचा सध्याचे आपले वागणे व भावना यांच्याशी कसे निगडित असते हे शिकवले जाते. तसेच प्राप्त परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आपले वागणे आणि विचारपद्धती कशी बदलावी हे सांगितले जाते.
 • संमोहन उपचार पद्धती – या मध्ये संमोहनशास्त्राचा वापर करून रुग्णाच्या सुप्तावस्थेतील मनाचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते.

पूरक उपचारपद्धती

Accupuncture व Reflexology यासारख्या काही पूरक उपचार पद्धती IBS च्या लक्षणांसाठी मदत करू शकतात.